Celebration of Tukaram: तुकारामांचा जयघोष; वाद्यांचा गजर, रांगोळीच्या पायघड्या

आळंदीतील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींचा आषाढी पायीवारी पालखी सोहळा शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास हजारो भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. मृदंगाचा
आळंदीतील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींचा आषाढी पायीवारी पालखी सोहळा शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास हजारो भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. मृदंगाचा निनाद आणि विविध वाद्यांचा गजर यामुळे वातावरण चैतन्यमय झाले होते. रांगोळीच्या पायघड्या आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे सोहळ्यातील आनंद द्विगुणित झाला. ३२ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 'श्रीं'ची भेट झाल्यामुळे आळंदीकरांचे तसेच भाविकांचे डोळे पाणावले होते. माउलींची पालखी आळंदीच्या वेशीवर येण्यापूर्वी प्रथेप्रमाणे चोपदारांकडून हरिपाठावरील शेवटच्या अभंगावर सुरू असलेल्या कीर्तनात माउलींची पालखी दाखल झाल्याची वर्दी देण्यात आली. चक्रांकित महाराजांच्या दिंडीने पालखीला सामोरे जाऊन स्वागत केले. त्यानंतर श्रीविष्णू मंदिर, श्रीराम मंदिर आणि हरीहरेद्रस्वामी मठमार्गे पालखी महाद्वारातून मंदिरात प्रवेश करताना भक्तांनी आरती घेतली. मंदिर प्रदक्षिणा केल्यानंतर विणा मंडपात पालखी स्थिरावली.
पालखीतील 'श्रीं'च्या पादुका गाभाऱ्यात समाधीसमोर विराजमान करून संस्थानतर्फे माउलींची आरती घेण्यात आली. आरतीनंतर श्री नरसिंग सरस्वती स्वामी महाराज मूळपीठ देवस्थानतर्फे 'श्रीं'ना भाकरीचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर हैबतबाबांच्या ओवरीकडे आरती घेण्यात आली. परंपरेनुसार चक्रांकित महाराजांच्यावतीने पिठलं-भाकरीचा प्रसाद वाटून अशा मंगलमय दिनाची सांगता करण्यात आली. आळंदीत माउलींना घेऊन येण्यासाठी स्थानिक नागरिक, ज्ञानेश्वर विद्यालय, तसेच शहरातील इतर शाळांमधील विद्यार्थी व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. थोरल्या पादुका मंदिरात पहिला आणि धाकट्या पादुका स्थळावर दुसरा विसावा घेण्यात आला.





















