Cyber Fraud in Company:कंपनीच्या संचालकांच्या नावाने सायबर फसवणूक

काही सायबर भामट्यांनी कंपनीच्या संचालकांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप प्रोफाइल आणि मायक्रोसॉफ्ट टीम्सवरील ग्रुप तयार करून दोन कंपन्यांना एकूण ४ कोटी २८ लाख रुपयां
काही सायबर भामट्यांनी कंपनीच्या संचालकांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप प्रोफाइल आणि मायक्रोसॉफ्ट टीम्सवरील ग्रुप तयार करून दोन कंपन्यांना एकूण ४ कोटी २८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात दक्षिण सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या भामट्यांनी जनरल मॅनेजर आरिफ सलीम अंसारी यांच्यासारख्या व्यक्तींना लक्ष्य केले, ज्यांनी बनावट संदेशावर विश्वास ठेवून मोठी रक्कम गमावली. ४ ऑगस्ट रोजी अंसारी यांना व्हॉट्सॲपवर एक संदेश आला, ज्यामध्ये 'हा माझा नवीन नंबर आहे' असे लिहिले होते. संचालकांचे नाव व छायाचित्र असलेले प्रोफाइल पाहून अंसारी यांना तो संदेश खरा वाटला. दुसऱ्या दिवशी, संबंधित व्यक्तीने त्यांना १ कोटी ९८ लाखांचे पेमेंट करण्याचे निर्देश दिले, ज्यामुळे अंसारी यांनी 'राजपूत एंटरप्रायझेस'च्या बँक खात्यावर ऑनलाइन व्यवहार पूर्ण केला. परंतु, नंतर त्यांनी प्रत्यक्ष संचालकांशी संपर्क साधल्यानंतर त्यांना समजले की ते सायबर फसवणुकीचे बळी ठरले आहेत. तक्रार दाखल केल्यानंतर, दक्षिण विभाग सायबर पोलिसांनी फसवणूक झालेल्या रकमेपैकी १ कोटी ८३ लाख रुपये वाचवण्यात यश मिळवले आहे. तपास सुरू आहे.
दुसऱ्या प्रकरणात, एका खासगी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापक परमेश्वरन अय्यर यांच्यावर २ कोटी ३० लाखांची फसवणूक झाली. ३१ जुलै रोजी, कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विनायक लेले यांना मायक्रोसॉफ्ट टीम्सवरील 'वर्क ग्रुप'मध्ये समाविष्ट करण्यात आले. या ग्रुपमध्ये संचालक चैतन्य देसाई आणि कुशल देसाई यांच्या नावाने बनावट आयडी तयार करण्यात आले होते. ग्रुप चॅटमध्ये कंपनीच्या खात्यातील शिल्लक विचारल्यानंतर, एका व्यावसायिकाला २ कोटी ३० लाख रुपये पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासाठी पश्चिम बंगालमधील 'एमबी रबर'च्या बँकेतील खात्याचा तपशील दिला गेला. अय्यर यांनी वरिष्ठांच्या सूचनेवर विश्वास ठेवून कंपनीच्या बँकेतील खात्यातून आरटीजीएसद्वारे रक्कम वर्ग केली. या प्रकरणातही पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे.





















