IND vs SL: भारतीय संघाची रंगीत तालीम! श्रीलंका क्रिकेट इलेव्हन जाहीर; कधी अन् कुठं रंगणार सराव सामना?

भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान कोलंबोतील नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब (ncc) मैदानावर श्रीलंका क्रिकेट इ
भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान कोलंबोतील नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब (NCC) मैदानावर श्रीलंका क्रिकेट इलेव्हन (SLC XI) विरुद्ध तीन दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या सामन्यात पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. श्रीलंका क्रिकेट इलेव्हनमध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल दिसून येतो. जून-जुलैमध्ये भारत 'अ' संघासोबत खेळलेल्या सामन्यातील सात खेळाडूंना या सराव सामन्यात संधी मिळाली आहे. भारतीय संघाला या सराव सामन्यात सलामीवीर साई सुदर्शनची साथ मिळणार नाही, कारण तो पायाच्या दुखापतीतून सावरत आहे. तथापि, त्याला सराव सामन्याच्या मध्यावर कोलंबोत संघात दाखल होण्याची शक्यता आहे. श्रीलंका दौऱ्यात भारत 'अ' संघाकडून खेळताना त्याने दोन्ही चार दिवसीय सामन्यांत शतके झळकावली होती, त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीचा भारतीय संघावर परिणाम होऊ शकतो.
भारतीय संघाच्या फलंदाजांसाठी हा सराव सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भारताने २०१५ आणि २०१७ मध्ये श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकली आहे, परंतु अलिकडच्या काळात फिरकीला पोषक खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या सराव सामन्यात टीम इंडियाने फिरकीच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश नसल्यामुळे मोहम्मद सिराजवर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल. फिरकीची मदार अनुभवी रवींद्र जडेजाच्या खांद्यावर असून, युवा डावखुरा फिरकीपटू मानव सुथार आणि ऑफस्पिन अष्टपैलू सारांश जैन यांच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असेल.



















