Insecticides Threaten Biodiversity: भारतातील ‘कृष्णकमालिनी’ ऑस्ट्रेलियात स्थिरावली

नाशिक : जागतिक तापमान वाढ आणि हवामानातील बदलामुळे फुलपाखरांच्या अधिवासात मोठे परिवर्तन होत आहे. भारतीय उपखंडातील 'कृष्णकमालिनी' या फुलपाखराची प्रजाती आता ऑस्ट्र
नाशिक : जागतिक तापमान वाढ आणि हवामानातील बदलामुळे फुलपाखरांच्या अधिवासात मोठे परिवर्तन होत आहे. भारतीय उपखंडातील 'कृष्णकमालिनी' या फुलपाखराची प्रजाती आता ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचली आहे. 'नेचर इकोलॉजी ॲन्ड इव्हॅल्यूएशन' या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, या प्रजातीचा विस्तार ऑस्ट्रेलियात वेगाने होत आहे. या संशोधनात ४० देशांतील ९५ शास्त्रज्ञांचा सहभाग होता, ज्यामध्ये नाशिकचे डॉ. विजय बर्वे यांचा समावेश आहे. त्यांनी १०५ हून अधिक देशांतील १,७५८ फुलपाखरू प्रजातींचा अभ्यास केला आहे. 'कृष्णकमलिनी' फुलपाखरू २०१२ मध्ये म्यानमार, थायलंड, आणि इंडोनेशिया मार्गे ऑस्ट्रेलियात पोहोचले. ऑस्ट्रेलियात या प्रजातीचा विस्तार दरवर्षी सुमारे १३५ किलोमीटर वेगाने होत आहे.
मोठा शेंदूरटोक्या (ग्रेट ऑरेंज ट्रीप) या फुलपाखराची व्याप्ती भारतात वाढत आहे, ज्याला शुभ संकेत मानले जात आहे. तथापि, तैवानमध्ये या प्रजातीची संख्या कमी होत असल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले आहे. दक्षिण आशियाई परिसंस्थेतील फुलपाखरांच्या स्थलांतराचा जागतिक जैवविविधतेवर होणारा प्रभाव महत्त्वाचा आहे. सुमारे ८० टक्के फुलपाखरांच्या प्रजातींनी हवामान बदलामुळे आपली राहण्याची ठिकाणे बदलली आहेत. याशिवाय, कीटकनाशकांचा अति वापर आणि शहरीकरणामुळे जंगलतोड यामुळेही फुलपाखरांच्या अधिवासावर नकारात्मक परिणाम होत आहे.





















