Mohan Bhagwat Gen Z:आंदोलन केल्याने जेन झी देशविरोधी ठरत नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती

मुंबई : सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले की, जेन झी किंवा जेन अल्फा यांच्यासारख्या तरुण पिढीने आंदोलन केले म्हणून ते देशविरोधी ठरू शकत नाहीत. उलट, हे तरुण
मुंबई : सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले की, जेन झी किंवा जेन अल्फा यांच्यासारख्या तरुण पिढीने आंदोलन केले म्हणून ते देशविरोधी ठरू शकत नाहीत. उलट, हे तरुण आपल्या पिढीपेक्षा अधिक देशभक्त आहेत. विरोधात होणारी आंदोलने संवाद साधण्याची एक पद्धत आहेत. आजच्या तरुणांना कोणतीही गोष्ट तर्कशुद्धपणे स्वीकारण्याची प्रवृत्ती आहे. त्यामुळे त्यांना धुडकावून लावण्याऐवजी संवाद साधण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या आंदोलनाच्या संदर्भात भागवत यांनी सांगितले की, जेन झीसोबत आधीच संवाद साधला असता तर आंदोलनाची आवश्यकता भासली नसती. हे विचार त्यांनी इंडिया इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनाईट नेशन्सच्या १५व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले, जिथे ऋषभ शाह यांनी त्यांची मुलाखत घेतली.
भागवत यांनी आपल्या वयानुसार तरुण पिढीच्या विचारशक्तीवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, आपल्या वयात वडीलधाऱ्यांचे ऐकणे आणि त्यांना प्रश्न न विचारणे हे सामान्य होते. परंतु आजची पिढी प्रश्न विचारते आणि त्यांना योग्य उत्तर आणि प्रेमाची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराबाबत विचारलेल्या प्रश्नावर भागवत यांनी सावध भूमिका घेतली. कोणत्याही घटनेवर मत व्यक्त करण्यापूर्वी त्यामागील परिस्थिती आणि कारणांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ वृत्तपत्रांतून मिळालेल्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे ते म्हणाले. वस्तुस्थिती समोर आल्यानंतरच संबंधित घटनांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.



















