Mard Strike Update: बीएचएमएस नोंदणीला विरोध कायम; आंदाेलन लाेकशाही मार्गाने सुरुच ठेवणार, मार्डचा निर्धार

मुंबई : महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संप मागे घेतला असला तरी सीसीएमपी-बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणीला असलेला विरोध कायम ठ
मुंबई : महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संप मागे घेतला असला तरी सीसीएमपी-बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणीला असलेला विरोध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेने स्पष्ट केले आहे की, आंदोलन कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने सुरू ठेवले जाईल. सरकारशी चर्चेच्या माध्यमातून या समस्येचा तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू राहील. उच्च न्यायालयाने गुरुवारी डॉक्टरांच्या आंदोलनाबाबत सुनावणी घेतली आणि संप तातडीने मागे घेण्याचे तसेच राज्य सरकार आणि मार्डच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा करण्याचे आदेश दिले. यामुळे डॉक्टरांनी आपली सेवा पुन्हा सुरू केली आहे, ज्यामध्ये नियमित बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), आंतररुग्ण विभाग (आयपीडी), नियोजित शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय प्रक्रिया समाविष्ट आहेत. आंदोलनामुळे स्थगित करण्यात आलेल्या सर्व सेवांना तत्काळ पूर्ववत सुरू करण्यात आले आहे.
आंदोलनाच्या कालावधीत, आपत्कालीन आणि अपघात विभागातील सेवा अखंडित चालू राहिल्या आहेत. संघटनेने स्पष्ट केले आहे की, रुग्णांच्या जीविताशी संबंधित सेवा कोणत्याही टप्प्यावर बंद करण्यात आलेल्या नव्हत्या. संप मागे घेतला असला तरी, संघटनेने आपल्या मागण्यांवर समाधानकारक निर्णय होईपर्यंत कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यासोबतच रुग्णसेवा अखंडित ठेवणे आणि कायदेशीर लढा सुरू ठेवणे या तिन्ही बाबींचा समतोल साधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मार्डने सांगितले आहे.



















