Manoj Jarange: 'कुणबी प्रमाणपत्र देऊन तेच रद्द करण्याचा सरकारचा कट'; जरांगेंचा आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा

वडीगोद्री (जि. जालना) : मराठा समाजाला दिलेली कुणबी जात प्रमाणपत्रे जाणीवपूर्वक रद्द करून विद्यार्थ्यांचे आणि युवकांचे नुकसान करण्याचा कट राज्य सरकारने रचल्याचा
वडीगोद्री (जि. जालना) : मराठा समाजाला दिलेली कुणबी जात प्रमाणपत्रे जाणीवपूर्वक रद्द करून विद्यार्थ्यांचे आणि युवकांचे नुकसान करण्याचा कट राज्य सरकारने रचल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे. त्यांनी अंतरवाली सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या इतर नेत्यांवर जोरदार टीका केली. जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले की, प्रशासनावर राजकीय दबाव टाकून प्रमाणपत्रे रद्द केली जात आहेत. बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये काही स्थानिक प्रतिनिधींच्या मराठा-कुणबी जातीच्या दाखल्यांना अवैध ठरवण्यात आले आहे, याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. जर हे प्रकार थांबले नाहीत, तर २९ ऑगस्टपासून मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दूरध्वनीवरून चर्चा करत प्रमाणपत्रे पडताळणीचे आश्वासन दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले की, मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १० टक्के टिकणारे आरक्षण दिले होते आणि त्यांना विविध सुविधा दिल्या आहेत. इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, याची माहिती जरांगे-पाटील यांनाही आहे. त्यामुळे त्यांचा गैरसमज दूर होईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यरत आहे आणि तिच्या अर्धन्यायिक अधिकारांचा वापर करून अनेक अर्ज फेटाळण्यात आले आहेत. भाजपच्या लोकप्रतिनिधींचेही अर्ज त्यात समाविष्ट आहेत, असे फडणवीस यांनी नमूद केले.



















