Operation White Sea:कारगिल युद्धाची अनकही कहाणी

कारगिल युद्धाच्या संदर्भात बोलताना, डोळ्यांसमोर येतात बर्फाच्छादित पर्वत, भारतीय जवानांची शौर्यगाथा आणि 'ऑपरेशन विजय'ची कहाणी. तथापि, या युद्धात भारतीय हवाई दला
कारगिल युद्धाच्या संदर्भात बोलताना, डोळ्यांसमोर येतात बर्फाच्छादित पर्वत, भारतीय जवानांची शौर्यगाथा आणि 'ऑपरेशन विजय'ची कहाणी. तथापि, या युद्धात भारतीय हवाई दलाने निभावलेली महत्त्वाची भूमिका अनेकदा दुर्लक्षित राहते. याच अनदेखी केलेल्या पण अत्यंत महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश टाकणारी 'ऑपरेशन सफेद सागर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ द कारगील वॉर' ही वेबमालिका विशेष ठरते. १९९९ च्या कारगिल युद्धात, भारतीय सैन्याने उंच शिखरांवर चढाई करत अत्यंत धैर्याने लढाई जिंकली. पाकिस्तानचे सैनिक उंचावर असल्याने त्यांना वरून हल्ला करणे सोपे होते, त्यामुळे भारतीय हवाई दलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. 'ऑपरेशन सफेद सागर' या मोहिमेच्या माध्यमातून हवाई दलाने आपली ताकद दाखवली. हवाई दलाच्या एका तुकडीची कहाणी म्हणजे स्क्वाड्रन गोल्डन अरोज. या तुकडीने विंग कमांडर धनोआ यांच्या नेतृत्वात १८ हजार फूट उंचीवरील लक्ष्यभेद करण्यासाठी ३० हजार फुटांवरून उडून कामगिरी साधली. या मोहिमेत स्क्वाड्रन लीडर अजय आहुजा शहीद झाले. त्यांच्या शौर्याची गाथा या वेबमालिकेत समोर येते. अजय आहुजा यांनी आपल्या सहकाऱ्याच्या क्षतीग्रस्त विमानाचा माग काढताना शत्रूभूमीत उतरले आणि त्यांना पाकिस्तानने ठार केले. या वेबमालिकेचे विशेष म्हणजे ती एक अनकही कथा आहे. कारगिल युद्धातील सैन्याच्या शौर्याच्या आणि बलिदानाच्या कथा अनेक सिनेमांमध्ये दाखविल्या गेल्या आहेत, परंतु हवाई दलाच्या मोहिमांची बारकाईने सांगितलेली कथा प्रेक्षकांसमोर पहिल्यांदाच येत आहे. या वेबमालिकेच्या क्रिएटर्सपैकी एक कुशल श्रीवास्तव हे भारतीय हवाई दलात कार्यरत होते आणि त्यांनी या तांत्रिक बारकाईंचा समावेश केला आहे. वेबमालिकेची एक महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे ती प्रेक्षकांना खिळवून ठेवते. भारतीय हवाई दलाच्या युद्धविमानांच्या उड्डाणापासून ते युद्धातील मोहिमांपर्यंतच्या सूक्ष्म तांत्रिक बाबींचा समावेश उल्लेखनीय आहे. विमान उड्डाण कसे करते, विशेष परिस्थितीत कोणती आव्हाने असतात, वैमानिकाला कोणते निर्णय क्षणात घ्यावे लागतात, याबद्दलची माहिती दृश्यात्मक थरार म्हणून न दाखवता कथानकाचा भाग बनवली आहे. या वेबमालिकेच्या पहिल्या सीझनमध्ये सहा भाग आहेत, प्रत्येक भाग साधारण तासाभराचा आहे. सुरुवातीचे दोन भाग थोडे संथ आहेत, पण नंतर मालिका वेग घेते. या वेबमालिकेत कारगिल युद्धाच्या काळातील राजकीय व युद्ध वृत्तांकनाचे खरे फुटेजही समाविष्ट आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा मैत्रीचा हात पुढे करण्याचा प्रयत्न आणि पाकिस्तानकडून झालेल्या आगळिकीला जशास तसे उत्तर देण्याची तयारी यांचे चित्रण केले आहे. या दोन्ही बाजू भडक संवाद किंवा अतिरेकी राष्ट्रवादी भाषेचा आधार न घेता पटकथेत गुंफल्या आहेत. स्क्वाड्रन लीडर अजय आहुजा यांची भूमिका अभिनेता सिद्धार्थने साकारली आहे, तर अन्य भूमिका जिम्मी शेरगील, आदिल हुसैन, अभय देओल, तारुक रैना, दिया मिर्झा, प्राजक्ता कोळी यांसारख्या कलाकारांनी साकारल्या आहेत. १९९९ मध्ये उपलब्ध तंत्रज्ञान आणि भारतीय नियंत्रण रेषेचे पालन करताना भारतीय हवाई दलाने दाखवलेली कल्पकता, प्रशिक्षण, अनुभव आणि निर्णयक्षमता यामुळे अशक्य वाटणारी मोहीम शक्य झाली. या थरारक मोहिमेचे पडद्यावरही थरारकपणे चित्रण करण्यात आले आहे. भारतीय हवाई दलातील वीरांची ही शौर्यगाथा प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवेल, अशी अपेक्षा आहे.


















