Traffic Jam in Lower Parel:लोअर परळ पुलावर वाहतूक कोंडी

मुंबईतील करी रोड रेल्वे पूल ते लोअर परळ पूल हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावर दररोज वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सकाळी आणि सा
मुंबईतील करी रोड रेल्वे पूल ते लोअर परळ पूल हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावर दररोज वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत, या मार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढते, ज्यामुळे नागरिकांना काही मिनिटांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी तासभर थांबावे लागते. त्यामुळे हा मार्ग मुंबईतील एक कायमचा ‘बॉटलनेक’ म्हणून ओळखला जात आहे. एन. एम. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग, डिलाईल रोड, लालबाग, वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ या भागांना जोडणारा हा मार्ग आहे. डिलाईल रोड ते लोअर परळमधील कॉर्पोरेट कार्यालये, व्यावसायिक संकुले, मॉल्स आणि रेल्वे स्थानकांकडे जाणारी वाहने याच मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे या परिसरात दिवसभर वाहतुकीचा ताण असतो. वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ येथील रुग्णांना केईएम, कस्तुरबा, ग्लोबल अशा रुग्णालयात जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग असल्याने येथे वाहतुकीचा ताण अधिक जाणवतो.
नवीन पुल बांधण्यात आले असले तरी दोन्ही टोकांना अरुंद रस्त्यामुळे वाहनांचा वेग कमी होतो. चौकांवरील सिग्नल, बस थांबे, थांबणाऱ्या टॅक्सी, रस्त्यालगत पार्किंग आणि मालवाहू वाहनांच्या वर्दळीमुळे वाहतूक विस्कळीत होते. एक छोटासा अपघात किंवा एखादे वाहन बंद पडले तरी दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. विशेषतः गर्दीच्या वेळेत पुलाजवळील वळणे व जोडरस्त्यांमधून येणारी वाहने मुख्य प्रवाहात मिसळल्याने कोंडीची तीव्रता वाढते. रस्त्याची लांबी कमी आणि कोंडीची तीव्रता मोठी असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.





















