Crowd at Kas Dam: कासवर भुशी डॅमचा ‘फील’ घेण्यासाठी तुफान गर्दी; वाहतूक कोंडीने स्थानिक त्रस्त

सातारा: जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कास पुष्पपठाराचा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कास तलाव आणि त्याच्या परिसरात पर्यटकांची संख्
सातारा: जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कास पुष्पपठाराचा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कास तलाव आणि त्याच्या परिसरात पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली आहे. कास तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागल्याने या ठिकाणाला लोणावळ्याच्या भुशी डॅमसारखे स्वरूप प्राप्त झाले आहे. निसर्गाचा हा अद्भुत अनुभव घेण्यासाठी शनिवार आणि सुट्टीच्या दिवशी राज्यभरातून पर्यटकांची तुफान गर्दी उसळत आहे. मात्र, या गर्दीमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पर्यटकांची हुल्लडबाजी, नियमांचे उल्लंघन आणि वाहतूक कोंडीमुळे स्थानिकांचे हाल होत आहेत.
पर्यटकांना सांडव्यावरून वेगाने वाहणाऱ्या पाण्यात भिजण्याचा मोह आवरत नाही, परंतु हा प्रवाह अत्यंत धोकादायक असल्याने प्रशासनाने येथे जाण्यास बंदी घातली आहे. तरीही काही अतिउत्साही पर्यटकांनी सुरक्षेसाठी लावलेले लोखंडी गेट तोडून पाण्यात उतरायचा प्रयत्न केला. पोलिसांना पर्यटकांना रोखताना मोठा संघर्ष करावा लागला, तर काही ठिकाणी पर्यटक आणि पोलिसांमध्ये तीव्र बाचाबाचीही झाली. निसर्गाचा आनंद लुटण्याऐवजी वाढत्या हुल्लडबाजीमुळे पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे.





















