Pune-Nashik Railway Project: पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प मूळ आराखड्यानुसार हवे

मंचर : पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात आंबेगाव तालुक्यातील नागरिकांनी एकत्र येऊन ठरवले आहे की, या प्रकल्पाला पूर्वी मंजूर झालेल्या मूळ आराखड्यानुसारच मा
मंचर : पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात आंबेगाव तालुक्यातील नागरिकांनी एकत्र येऊन ठरवले आहे की, या प्रकल्पाला पूर्वी मंजूर झालेल्या मूळ आराखड्यानुसारच मार्गस्थ करावा लागेल. आंबेगाव तालुक्याला डावलणारा कोणताही पर्यायी मार्ग स्वीकारला जाणार नाही, याबाबत पुणे-नाशिक रेल्वे कृती समितीने ठाम भूमिका घेतली आहे. यासाठी ९ ऑगस्ट रोजी मंचर बसस्थानकासमोर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत शेतकरी, व्यापारी, उद्योजक, वकील, डॉक्टर, विद्यार्थी, नोकरदार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन मूळ आराखड्यात कोणताही बदल न करता रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली.
बैठकीत उपस्थितांनी स्पष्ट केले की, पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे आंबेगावसह उत्तर पुणे जिल्ह्याच्या उद्योग, व्यापार, शेती, पर्यटन, शिक्षण आणि रोजगार क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाचा निर्णय तालुक्याच्या विकासाला अडथळा आणणारा ठरू शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, तसेच उद्योगधंद्यांना चालना मिळेल, याबाबत सर्व उपस्थितांनी एकमताने आपले विचार मांडले.



















