Protest for Nashik-Pune Railway: नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्गासाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको

नाशिक – नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या स्थापनेसाठी सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीने गावागावांत जनजागृती अभियान सुरू केले आहे. या अभियानाला सर्वत्र उत्स्फूर्त
नाशिक – नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या स्थापनेसाठी सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीने गावागावांत जनजागृती अभियान सुरू केले आहे. या अभियानाला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक ग्रामस्थांनी बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि भजनी मंडळांसह आंदोलनात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथे समृद्धी महामार्ग आणि नाशिक–पुणे महामार्गावर एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या संदर्भात मनेगाव, गोंदे, माळवाडी, दोडी, चास आणि नळवाडी येथे बैठकांद्वारे जनजागृती करण्यात आली. प्रत्येक गावात ग्रामस्थ, महिला, युवक, विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि विविध सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शविला आहे.
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग हा उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. हा मार्ग उद्योग, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सिन्नर एमआयडीसी आणि चाकण एमआयडीसी यांना थेट जोडणारा हा मार्ग औद्योगिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना देईल. या जनजागृती दौऱ्यात हरिभाऊ तांबे, बबन वाजे, प्रा. राजाराम मुंगसे, राजाराम मुरकुटे, संजय सोनवणे, बंडू नाना भाबड, जगन पाटील भाबड, अकोल्याचे कारभारी पाटील उगले तसेच संगमनेर युवक काँग्रेसचे अध्यक्ष आनंदा वरपे, सुभाष सांगळे यांसारखे अनेक मान्यवर सहभागी झाले होते. या सर्वांच्या उपस्थितीने आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे.



















