Food Safety Concerns: '१००% शुद्ध' या दाव्यावर किती विश्वास ठेवणार?

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (fssai) डाबर कंपनीच्या काही उत्पादनांवर ‘१०० टक्के शुद्ध’ असे दावे तातडीने हटवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे ग्राहका
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) डाबर कंपनीच्या काही उत्पादनांवर ‘१०० टक्के शुद्ध’ असे दावे तातडीने हटवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की, खरेच हे पॅकबंद अन्न पदार्थ शुद्ध आहेत का? मध, तूप आणि नारळाचे दूध यांसारख्या उत्पादनांबाबत अनेकांचे प्रश्न आहेत. तथापि, एफएसएसएआयचा आक्षेप या दाव्यांच्या स्पष्ट व्याख्येच्या अभावामुळे आहे, ज्यामुळे ग्राहकांना उत्पादनांची शुद्धता आणि पोषणमूल्यांबाबत गोंधळ निर्माण होतो. एफएसएसएआयने यापूर्वी मे २०२५ मध्ये सर्व खाद्यपदार्थ उत्पादकांना ‘१०० टक्के’ शुद्ध असे दावे टाळण्याचे निर्देश दिले होते, कारण या दाव्यांची कोणतीही स्पष्ट व्याख्या भारतीय अन्न नियमांमध्ये नाही. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते, म्हणून उत्पादनाच्या लेबलवर वस्तुस्थिती मांडणारी माहिती असावी, असे एफएसएसएआयने स्पष्ट केले आहे. ग्राहक अनेकदा ‘नैसर्गिक’, ‘शुद्ध’ आणि ‘ताजे’ या शब्दांचा अर्थ आरोग्यदायी अन्न असा घेतात, परंतु शास्त्रीयदृष्ट्या हे शब्द ठोस निकषांवर आधारित नाहीत. पॅकेजबंद अन्नासाठी ‘१०० टक्के नैसर्गिक’ अशी कोणतीही सार्वत्रिक व्याख्या अस्तित्वात नाही, असे तज्ज्ञ सांगतात.
अनेक पॅकबंद अन्नपदार्थ निसर्गात ज्या स्वरूपात मिळतात, त्याच स्वरूपात ग्राहकांपर्यंत पोहोचत नाहीत. उत्पादनाच्या प्रक्रियेत धुणे, गाळणे, पाश्चरायझेशन, होमोजेनायझेशन, वाळवणे आणि पॅकेजिंग यांसारख्या अनेक प्रक्रियांचा समावेश असतो. या प्रक्रियांचा उद्देश अन्न अधिक सुरक्षित, दर्जेदार आणि दीर्घकाळ टिकणारे बनवणे हा आहे. दिल्लीतील अपोलो रुग्णालयातील एंडोक्रिनोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सप्तर्षी भट्टाचार्य याबाबत सांगतात की, या प्रक्रियांच्या माध्यमातून अन्नाची गुणवत्ता, चव आणि टिकाऊपणा वाढवला जातो. तथापि, या प्रक्रियेनंतर ‘१०० टक्के नैसर्गिक’ असे म्हणणे शास्त्रीयदृष्ट्या योग्य नाही. ग्राहकांच्या मनात ‘शुद्ध’ म्हणजे कोणतीही प्रक्रिया न केलेले उत्पादन असा समज असतो, परंतु आधुनिक अन्नउद्योगाची कार्यपद्धती यापासून खूप वेगळी आहे.



















