Threat of Reopening Cases:महिलेवर खंडणीचा आरोप

मुंबईतील वांद्रे परिसरात एका सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरने एका महिलेवर खंडणी उकळण्याचा गंभीर आरोप केला आहे. या महिलेने तक्रारदार आणि त्याच्या भावाला खोट्या गुन्ह्यांत
मुंबईतील वांद्रे परिसरात एका सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरने एका महिलेवर खंडणी उकळण्याचा गंभीर आरोप केला आहे. या महिलेने तक्रारदार आणि त्याच्या भावाला खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याची तसेच न्यायालयाने रद्द केलेली प्रकरणे पुन्हा सुरू करण्याची धमकी देत चार लाख रुपयांची खंडणी मागितली. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ पासून संबंधित महिला त्याला आणि त्याच्या भावाला सतत धमकावत होती. तिला त्यांच्यावर खोट्या गुन्ह्यांची रचना करण्याची धमकी देत पैशांची मागणी करत होती. या दबावामुळे तक्रारदाराने २७ एप्रिल रोजी वांद्रे तलाव परिसरात दोन लाख ४० हजार रुपये दिले, असे त्याने सांगितले आहे. पोलिसांनी या प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. तक्रारदाराच्या काकांविरुद्ध दाखल असलेल्या तक्रारीसाठी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी एक लाख ६० हजार रुपये दिल्याचा आरोप आहे. या व्यवहाराबाबत स्टॅम्प पेपर असल्याचेही सांगितले जात आहे. १ मे रोजी कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती, ज्यामुळे पोलिसांत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. २८ जुलैला वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ तक्रारदार आणि त्याचा भाऊ चहा पिण्यासाठी उभे असताना संबंधित महिला मोबाइलवरून रेकॉर्डिंग करत असल्याचे दिसून आले. त्यावेळी तिने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारदाराने सांगितले. या प्रकरणातही पोलिसांनी स्वतंत्र अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांमुळे तक्रारदार सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार करण्यास घाबरत होता. मात्र, धमक्यांचे प्रकार सुरूच राहिल्याने त्याला पोलिसांकडे धाव घेण्यास भाग पडले. तक्रारदाराने दोन लाख ४० हजार रुपये आणि त्याच्या काकाने एक लाख ६० हजार रुपये, अशा एकूण चार लाख रुपयांची रक्कम खंडणीच्या स्वरूपात स्वीकारल्याचा आरोप संबंधित महिलेवर करण्यात आला आहे.





















