Mother Cat's Determination:मांजराची पिलांसाठीची जिद्द

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मनोरंजनासाठी असतात, तर काही आपल्या मनाला स्पर्श करतात. सध्या एक व्हिडीओ चर्चेत आहे, ज
सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मनोरंजनासाठी असतात, तर काही आपल्या मनाला स्पर्श करतात. सध्या एक व्हिडीओ चर्चेत आहे, ज्यामध्ये एक मांजर आपल्या पिलांपर्यंत पोहोचण्यासाठी उंच भिंत चढण्याचा प्रयत्न करत आहे. ती अनेकवेळा खाली पडते, पण प्रत्येक वेळी ती पुन्हा उभी राहते आणि भिंत चढण्याचा प्रयत्न सुरू ठेवते. या व्हिडीओने अनेकांना भावूक केले आहे, कारण आईची माया केवळ माणसांपुरती मर्यादित नसते, याची जाणीव या प्रसंगातून होते. व्हिडीओमध्ये दिसते की मांजर भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत आहे, पण भिंत उंच असल्यामुळे तिचा तोल जातो आणि ती खाली पडते. पण ती लगेचच पुन्हा भिंतीकडे धाव घेते, तिच्या पिलांपर्यंत पोहोचण्याची तिची जिद्द स्पष्टपणे दिसते. व्हायरल झालेल्या या दृश्यात मांजर पूर्ण ताकदीने भिंतीवर चढते. कधी ती थोड्या उंचीवर पोहोचते, तर कधी थोडे अंतर पार केल्यानंतर ती पुन्हा खाली पडते. प्रत्येक वेळी ती हार मानत नाही, पुन्हा खाली येते आणि पुन्हा चढण्यास सुरुवात करते. तिच्या या प्रयत्नांमागे केवळ भिंत पार करण्याचे आव्हान नसून, आपल्या पिलांना भेटण्याची धडपड आहे. या प्रसंगात आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे काही लोक मांजर खाली पडू नये म्हणून मोठे पांघरूण घेऊन उभे आहेत. मांजर पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असताना काही जण हा संपूर्ण प्रसंग मोबाईलमध्ये चित्रित करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बचाव पथक येण्याचीही वाट पाहिली जात होती, त्यामुळे मांजरीला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाच तिच्या पिलांपर्यंत पोहोचण्याच्या धडपडीचे हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. या व्हिडीओने अनेकांना मांजरीच्या धैर्याचे आणि जिद्दीचे कौतुक केले आहे. आपल्या पिलांपर्यंत पोहोचण्यासाठी ती कोणत्याही अडथळ्यापुढे थांबायला तयार नसल्याचे अनेकांनी म्हटले आहे. काही वापरकर्त्यांनी आईची माया ही प्रत्येक जीवामध्ये सारखीच असते, अशी भावना व्यक्त केली आहे. आपल्या लेकरांसाठी आई कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकते, हे या मांजरीच्या प्रयत्नातून दिसून येत आहे. व्हिडीओवर अनेक भावनिक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका वापरकर्त्याने म्हटले की, आईचे प्रेम आणि माणुसकीची भावना सर्वत्र सारखीच असते. दुसऱ्या एका वापरकर्त्याने आईच्या ममतेपेक्षा मोठे प्रेम दुसरे काही नसल्याची भावना व्यक्त केली आहे. काही जणांनी मांजरीच्या जिद्दीचे कौतुक करत तिचे प्रयत्न पाहण्यासारखे असल्याचे म्हटले आहे. या मांजरीचा व्हिडीओ केवळ तिच्या प्रयत्नांमुळे व्हायरल झालेला नाही, तर त्यातून मिळणाऱ्या भावनेमुळेही तो लोकांच्या मनाला भिडत आहे. वारंवार अपयश आले तरी प्रयत्न न सोडण्याची तिची जिद्द आणि आपल्या पिलांपर्यंत पोहोचण्याची धडपड पाहून अनेकांना या प्रसंगातून एक साधा संदेश मिळत आहे – अडथळे कितीही मोठे असले तरी जिद्द आणि मायेपुढे त्यांनाही हरावे लागते.





















