Responsible Tourism at Waterfalls:धबधब्यांवर जबाबदारीने पर्यटन करा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मान्सूनच्या काळात धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिकांना गोवा वन विकास महामंडळाने जबाबदारीने पर्यटन करण्याचे
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मान्सूनच्या काळात धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिकांना गोवा वन विकास महामंडळाने जबाबदारीने पर्यटन करण्याचे आवाहन केले आहे. पर्यावरणाचे संरक्षण करताना, सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. धबधब्यांच्या ठिकाणी घडलेल्या काही अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर ही सूचना दिली जात आहे. जीएफडीसीने जनजागृती मोहिम सुरू केली असून, या मोहिमेद्वारे पर्यटकांना धबधब्यांवर जाताना मार्गदर्शक व वनरक्षकांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे, केवळ परवानगी असलेल्या ठिकाणीच भेट देणे आवश्यक आहे. धबधब्यांच्या परिसरात कचरा टाकणे टाळावे आणि उपलब्ध कचरापेट्या वापराव्यात, असे जीएफडीसीने स्पष्ट केले आहे. पर्यटकांनी सुरक्षा फलक व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
जीएफडीसीने धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये मार्गदर्शक, वनरक्षक, स्वच्छतागृहे, कपडे बदलण्याची व्यवस्था, कचरापेट्या आणि सुरक्षा फलक यांचा समावेश आहे. पर्यटकांनी या सर्व सुविधांचा उपयोग करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे. धबधब्यांवर भेट देणाऱ्या सर्वांनी सुरक्षा फलकावर दिलेल्या सूचनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गोव्यातील दूधसागर, सावरी, मैनापी, पाळी, नानेली आणि चरावणे हे सहा धबधबे जीएफडीसीच्या व्यवस्थापनाखाली आहेत, तर इतर धबधबे जीएफडीसीच्या व्यवस्थापनात नाहीत, याची पर्यटकांनी नोंद घ्यावी.




















