Voter List Update in Ahilyanagar:अहिल्यानगरच्या मतदार यादीत १ लाख ४० हजार ७६६ मृतांची नावे

अहिल्यानगर: जिल्ह्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत (एसआयआर) सध्या असंकलित मतदारांची संख्या ४ लाख २६ हजार ११३ आढळली आहे. यामध्ये १ लाख ४० हजार ७
अहिल्यानगर: जिल्ह्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत (एसआयआर) सध्या असंकलित मतदारांची संख्या ४ लाख २६ हजार ११३ आढळली आहे. यामध्ये १ लाख ४० हजार ७६७ मृत मतदारांची नावे समाविष्ट आहेत, तर ६० हजार ८४१ मतदारांची नावे दुबार आढळली आहेत. उर्वरित २ लाखांपेक्षा अधिक मतदार हे कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले आहेत किंवा त्यांना मदत करणाऱ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना त्यांचा शोध लागलेला नाही. या असंकलित मतदारांचे एकूण मतदारांमध्ये प्रमाण १२.१८ टक्के आहे, तर नगर शहरात हे प्रमाण २२ टक्के आहे. अकोल्यामध्ये मात्र हे प्रमाण ५.९३ टक्के असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी दिली. जिल्ह्यात एकूण १२ विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी नगर शहर, कर्जत-जामखेड, श्रीरामपूर, शिर्डी आणि कोपरगाव या पाच मतदारसंघांचे ‘एसआयआर’चे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित मतदारसंघांचे ९८ टक्के पेक्षा अधिक काम पूर्ण झाले असून, लवकरच अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कामे पूर्ण होतील, असा विश्वास गाढे यांनी व्यक्त केला. याशिवाय, निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’ मोहिमेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एसआयआर’चे काम सुरू आहे. जिल्ह्यात एकूण ३८ लाख १० हजार १०२ मतदार आहेत, त्यापैकी असंकलित मतदारांची संख्या ४ लाख २६ हजार ११३ आहे. या संकलित मतदारांची यादी प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे देण्यात आली आहे. याशिवाय, राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय सहाय्यकांनाही (बीएलए) या याद्या देण्यात आल्या आहेत. या याद्यांवर चर्चा करण्यासाठी राजकीय पक्षांच्या सहाय्यकांबरोबर बैठका घेण्याच्या सूचना बीएलओ यांना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाल्यानंतर मयत, दुबार आणि कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांच्या याद्या स्थानिक, तालुका आणि जिल्हा स्तरावर प्रसिद्ध केल्या जातील.



















