NEET Paper Leak: तज्ज्ञांनीच विकला NEET चा पेपर

नीट पेपरफुटीच्या प्रकरणात सीबीआयने दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात सीबीआयने नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (nt
नीट पेपरफुटीच्या प्रकरणात सीबीआयने दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात सीबीआयने नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) तीन विषय तज्ज्ञांसह एकूण १३ आरोपींची नावे दिली आहेत. सीबीआयने या प्रकरणात सुनियोजित आणि बहुराज्यीय गुन्हेगारी कट असल्याचे स्पष्ट केले आहे. आरोपपत्रानुसार, NTA च्या विषय तज्ज्ञांनी प्रश्नपत्रिका फोडल्या आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मध्यस्थांचा वापर केला. या प्रकरणात सीबीआयने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत, ज्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.
आरोपपत्रात तीन प्रमुख विषय तज्ज्ञांची नावे समाविष्ट आहेत. वनस्पतीशास्त्राच्या मनिषा गुरुनाथ मांढरे, रसायनशास्त्राचे प्रल्हाद विठ्ठलराव कुलकर्णी आणि भौतिकशास्त्राच्या मनिषा संजय हवालदार यांचा समावेश आहे. या तिघांनी प्रश्नपत्रिका फोडल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. या तिघांच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका कोचिंग क्लासेसच्या चालकांकडे आणि मध्यस्थांकडे सोपवण्यात आल्या, ज्यामुळे त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या. सीबीआयने याबाबत सखोल तपास सुरू ठेवला असून, आरोपींवर भारतीय दंड संहिता, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) कायदा, २०२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



















