Meeting with Prashant Kishor:सुनेत्रा पवार, पार्थ-जय यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची ५ तास बैठक

मुंबई - बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवणारे जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भ
मुंबई - बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवणारे जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीला सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी प्रशांत किशोर उपस्थित होते. या बैठकीत जवळपास ५ तास चर्चा झाली, परंतु या चर्चेत नेमकी कोणती रणनीती आखली गेली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या बैठकीमुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. प्रशांत किशोर यांची सुनेत्रा पवार यांच्यासोबतची ही दुसरी भेट आहे. याआधी, अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. आता पुन्हा एकदा बांकीपूर पोटनिवडणुकीतील विजयानंतर ही भेट झाली आहे. निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासोबतच्या या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आगामी कार्यात प्रशांत किशोर यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे, असे बोलले जात आहे.
मे महिन्यात खासदार पार्थ पवार यांनी मुंबईत सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीवर भाजपाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तथापि, या बैठकीवर दोन्ही पक्षांनी अधिकृतपणे काही स्पष्टीकरण दिलेले नाही. परंतु, प्रशांत किशोर यांची निवडणूक कॅम्पेन कंपनी राष्ट्रवादीसोबत काम करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या हाती राष्ट्रवादीची कमान आली आहे. मध्यंतरीच्या काळात पक्षातील काही वाद समोर आले होते, ज्यात निवडणूक आयोगाला लिहिलेले पत्रही चर्चेत आले होते. या एकंदर परिस्थितीत पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी प्रशांत किशोर यांची मदत घेतली जात आहे. गुरुवारी या दोन्ही नेत्यांमध्ये तीन महिन्यातील दुसरी बैठक पार पडली.



















