Tragic Incident in Gadchiroli:गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणात संताप

गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेत घडलेल्या सर्पदंशाच्या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या घटनेत शाळेतील मुख्याध्यापक
गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेत घडलेल्या सर्पदंशाच्या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या घटनेत शाळेतील मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, मात्र आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या कारणामुळे जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन निष्पाप आदिवासी मुलींचा जीव गेला असून, प्रशासनाने गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप विविध संघटनांनी केला आहे.
१० ऑगस्टच्या मध्यरात्री जपतलाई अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थिनी गाढ झोपेत असताना सर्पदंशाची भयानक घटना घडली. साप चावल्यानंतर तात्काळ उपचार मिळण्यात झालेल्या दिरंगाईमुळे तीन विद्यार्थिनींचा जीव गेला. दीपिका ऐतवा लकडा, सुष्मिता सरोजीत मंडल आणि अनु गजुराम कोरेटी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकूण सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाला असून, कविता राजकुमार किंरगे आणि समृद्धी सुरेश नैताम यांच्यावर गडचिरोलीत उपचार सुरू आहेत. दीपिका बिटकूरसाय मडावी हिला गंभीर अवस्थेत नागपूर येथे हलविण्यात आले आहे, परंतु तिघींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.





















