Tribute to a Literary Giant: श्रीनिवास कुलकर्णी यांचे निधन

सांगली : औदुंबरच्या मातीशी जुळलेले ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाने औदुंबरचा ‘डोह’ जणू अबोल झाला आहे. त्यांच्या लेखणीतून औदुंबरचा निसर्ग, सं
सांगली : औदुंबरच्या मातीशी जुळलेले ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाने औदुंबरचा ‘डोह’ जणू अबोल झाला आहे. त्यांच्या लेखणीतून औदुंबरचा निसर्ग, संस्कृती आणि ग्रामीण जीवनाचे चित्रण केले गेले आहे. कुलकर्णी यांच्या जाण्यामुळे साहित्य क्षेत्रासह औदुंबर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. श्रीनिवास कुलकर्णी यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण औदुंबर येथे झाले. घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्यांनी सांगली येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी साहित्य क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले. औदुंबर येथे मकर संक्रांतीच्या दिवशी पारंपरिक सदानंद साहित्य संमेलनाच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. कवी सुधांशू यांच्यासमवेत त्यांनी या संमेलनाच्या कार्यात सक्रिय भूमिका बजावली. प्रारंभात उपाध्यक्ष म्हणून काम पाहिल्यानंतर कवी सुधांशू यांच्या निधनानंतर त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. तब्बल ८३ वर्षांची परंपरा लाभलेल्या या साहित्य संमेलनाला त्यांनी नवे वैचारिक आणि साहित्यिक अधिष्ठान दिले. ‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’ आणि ‘कोरडी भिक्षा’ यांसारख्या ललित साहित्यकृतींमधून त्यांनी औदुंबर परिसरातील निसर्ग, माणसे आणि संस्कृती शब्दबद्ध करून वाचकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान मिळवले. त्यांच्या साहित्यामुळे औदुंबरचा परिसर राज्यभरातील साहित्यप्रेमींपर्यंत पोहोचला. औदुंबर साहित्य संमेलनात अनेक थोर साहित्यिकांना अध्यक्ष म्हणून आणण्याचे काम त्यांनी केले. ‘मौज’चे संपादक आणि साहित्य क्षेत्रातील त्यांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे अनेक नामवंत साहित्यिकांचे विचार ग्रामीण भागातील रसिकांपर्यंत पोहोचले. ग्रामीण महाराष्ट्रात साहित्याची गोडी निर्माण करण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. साहित्य क्षेत्रातील जेष्ठ समिक्षक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष म. द. हातकणंगलेकर यांच्याशी त्यांची मैत्री होती. समिक्षक अविनाश सप्रे, डॉ. दिलीप शिंदे, महेश कराडकर, अभिजित पाटील, विजय जाधव आदींसोबत कवी सुधांशू यांच्या कुटुंबीयांशी त्यांचा निकटचा सहवास लाभला होता. गेल्या वर्षी महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाच्यावतीने मिरज विद्यार्थी संघाच्या खरे वाचन मंदिर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात त्यांचा सत्कार करण्यात आला होता. साहित्य, संस्कृती आणि ग्रामीण जीवन यांचा सेतू बनलेले श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाने औदुंबरची साहित्य परंपरा एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकली आहे. त्यांच्या स्मृती आणि साहित्यकृती मात्र पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील.



















