Historical Insights:राजवाडे विचारविश्व: शहाजीराजे निजामशाहीतून आदिलशाहीकडे

भातवडीच्या लढाईत आदिलशहाला पराभूत करण्याच्या उद्देशाने मलिकंबरने त्याचे सैन्य विजापूरच्या इलाख्यात नेऊन आदिलशहाने वसवलेले नवरसपूर जाळून खाक केले. ‘ही मोहीम १५४७
भातवडीच्या लढाईत आदिलशहाला पराभूत करण्याच्या उद्देशाने मलिकंबरने त्याचे सैन्य विजापूरच्या इलाख्यात नेऊन आदिलशहाने वसवलेले नवरसपूर जाळून खाक केले. ‘ही मोहीम १५४७च्या चैत्रवैशाखात आटोपल्यावर पावसाळ्यात सैन्य आपल्या जागी परतले. सैन्याबरोबर शहाजी व खेळोजी भोसले मंडळीही राजधानीस परत आली,’ असे राजवाड्यांनी सांगितले. मलिकंबरच्या बगलबच्च्यांनी मूर्तिजाच्या मनात असे भरवले की, भातवडीची लढाई, नवरसपूरची जाळपोळ व सोलापूरचा वेढा विजयाने शेवटास नेण्यात शहाजीचा पराक्रम विशेष नसून, मुख्य कर्तबगारी खेळोजी भोसल्याची आहे. त्यामुळे मूर्तिजाने शहाजीला न गौरविता खेळोजीचा आदर विशेष केला. शहाजीच्या मनस्थितीचे वर्णन करताना राजवाड्यांनी सांगितले की, ‘शहाजीला असे दिसले की, मूर्तिजा आता त्याच्यावर उलटला आहे. कर्त्या व चढत्या शहाजीच्या शत्रुमंडळींत आता घरचे भाऊ खेळोजी व राज्याचा धनी मूर्तिजा यांची गणना होऊ लागली.’ यामुळे शहाजीला सुरक्षिततेचा मार्ग धुंडाळणे भाग पडले. खिन्न होऊन बसता, तर शहाजी ह्या चौकडीपुढे नष्ट झाला असता. शहाजीच्या पराक्रमाचे तेज सहन न होऊन निजामशाहीतील प्रमुख सूत्रधार शहाजीच्या विरुद्ध झाले, तर आदिलशाहीतील मुख्य कर्णधारांनी शहाजीशी संधान बांधले. शक १५४७च्या पावसाळ्यानंतर शहाजी स्वसैन्यासह आदिलशाहीला गेला आणि तिथे त्याला मनसबदारी व अक्कलकोटची जहागीर मिळाली.



















