FDA Takes Action: ब्लिंकिटच्या मालाडचा अन्न परवाना निलंबित

मुंबईतील मालाड पश्चिम येथील ब्लिंकिटच्या आस्थापनेमध्ये झुरळे आणि अस्वच्छतेमुळे अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर अन्न
मुंबईतील मालाड पश्चिम येथील ब्लिंकिटच्या आस्थापनेमध्ये झुरळे आणि अस्वच्छतेमुळे अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ब्लिंक कॉमर्स प्रा. लि. या कंपनीचा अन्न परवाना तात्काळ निलंबित केला आहे. यासोबतच, रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या बुलढाणा येथील आस्थापनेमध्ये काजू कतलीमध्ये बुरशी आणि अळ्या आढळल्याने एफडीएने कारवाई करत १० हजार रुपयांच्या ५४ बॉक्स जप्त केले आहेत. राज्यभरात एफडीएने विविध आस्थापनांवर धाडसत्र सुरू केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ठिकाणी कठोर कारवाई केली जात आहे.
मालाडमधील ब्लिंकिटच्या गोदामात अत्यंत अस्वच्छता आढळली आहे. झुरळे आणि अन्नपदार्थ गंजलेल्या रॅक्सवर ठेवलेले आढळले आहेत. याशिवाय, गोदामातील कोल्ड स्टोरेजची स्थिती अत्यंत खराब आहे. मुदतबाह्य आणि खराब पॅकिंग असलेल्या अन्नपदार्थांचा साठा देखील आढळला आहे. कीटक व उंदीर नियंत्रणाच्या उपाययोजनांचा अभाव, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी न केलेली आणि आवश्यक वैयक्तिक स्वच्छता साधनांचा अभाव आढळून आल्याने एफडीएने या आस्थापनेचा अन्न परवाना निलंबित केला आहे. या निलंबन कालावधीत कोणत्याही प्रकारच्या अन्नपदार्थांची विक्री किंवा वितरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. निलंबन कालावधीत व्यवसाय सुरू असल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे एफडीएने स्पष्ट केले आहे.





















