Breastfeeding Decision:स्तन्यपानाचा निर्णय आईचा की…

स्तन्यपान हे बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, हे सर्वज्ञात आहे. आईचे दूध हे नवजात बाळासाठी सर्वात उत्तम पोषण मानले जाते. त्यामुळे, जगभरात आईच्या दुधा
स्तन्यपान हे बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, हे सर्वज्ञात आहे. आईचे दूध हे नवजात बाळासाठी सर्वात उत्तम पोषण मानले जाते. त्यामुळे, जगभरात आईच्या दुधाला सुरक्षित, संपूर्ण आणि जैविकदृष्ट्या सर्वोत्तम अन्न म्हणून मान्यता आहे. तथापि, याच्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे जर स्तन्यपान इतके प्रभावी आणि सुरक्षित आहे, तर गेल्या काही वर्षांत बाळांसाठीच्या दूधभुकटीचा बाजार अब्जावधी डॉलर्सपर्यंत कसा पोहोचला आहे? याचे उत्तर वैद्यकीय विज्ञानातच नाही तर सार्वजनिक धोरणे, बाजारपेठ, कॉर्पोरेट हितसंबंध आणि सामाजिक व्यवस्थेच्या परस्परसंबंधात दडलेले आहे. दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तन्यपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. यंदाची संकल्पना स्तन्यपानाला मातृत्वाच्या पलीकडे शाश्वत विकासाचा पाया मानते. जन्मानंतरच्या पहिल्या तासात बाळाला आईचे पहिले दूध मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. WHO आणि UNICEF यांच्या मते, जन्मानंतर पहिल्या तासात स्तन्यपान सुरू करणे आणि पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध देणे हे बालआरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. स्तन्यपानामुळे अनेक आरोग्य समस्यांचा धोका कमी होतो, मात्र प्रत्यक्षात भारतात स्तन्यपानाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते. NFHS-6 च्या अहवालानुसार, भारतात आणि महाराष्ट्रात प्रशिक्षित आरोग्य कर्मचार्यांच्या देखरेखीखाली होणाऱ्या प्रसूतीचे प्रमाण ९०.६ टक्के आहे, पण जन्मानंतर पहिल्या तासात स्तन्यपान मिळणाऱ्या बालकांचे प्रमाण कमी झाले आहे. पुण्यातील नागरी वस्त्यांमध्ये केवळ ४५.२ टक्के मातांनी पहिल्या तासात स्तन्यपान सुरू केले, तर सहा महिन्यांपर्यंत केवळ २३.७ टक्के मातांनी केवळ स्तन्यपान केले. हे सर्व दर्शवते की, संस्थात्मक प्रसूती वाढवणे आवश्यक आहे, परंतु प्रत्येक बालकाला पहिल्या तासात स्तन्यपान मिळवणे आणि सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तन्यपान करणे यामध्ये मोठा तफावत आहे.
स्तन्यपानाचे प्रमाण कमी होत असल्याने मातांना दोषी ठरवले जाते. 'आईचे दूध पुरेसे नाही', 'सिझेरियनमुळे स्तन्यपान शक्य नाही' असे अनेक आरोप केले जातात, पण वास्तवात बहुतेक वेळा दुधाची कमतरता नसते. अडचण असते ती योग्य समुपदेशनाची, कामाच्या ठिकाणच्या सुविधांची, पगारी प्रसूती रजांची आणि कुटुंबाच्या पाठबळाची. त्यामुळे स्तन्यपानाचा प्रश्न हा केवळ मातांच्या इच्छाशक्तीचा नसून समाज, आरोग्य व्यवस्था आणि सार्वजनिक धोरणांचा आहे. जर स्तन्यपान आरोग्यदृष्ट्या फायदेशीर आणि आर्थिकदृष्ट्या सर्वाना परवडणारे असेल, तर कृत्रिम दूधभुकटीचा बाजार इतक्या वेगाने का वाढतो आहे? यामध्ये सरकारची धोरणे, आरोग्य व्यवस्था, रोजगाराच्या अटी, जाहिरात, कॉर्पोरेट उद्योग आणि सामाजिक मूल्ये यांचा मोठा प्रभाव आहे. 'द लँसेट ब्रेस्टफिडिंग सिरीज' २०२३ नुसार, कृत्रिम दूधभुकटी उद्योगाची वार्षिक उलाढाल ५५ अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे, जी सातत्याने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, बाळांना पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तन्यपान मिळायला हवे, मात्र जगातील निम्म्याहून कमी बालकांना ते मिळते.





















