School Knife Attack: दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला, एक गंभीर जखमी

देवगाव रंगारी येथील एका शाळेत गुरुवारी (दि. ६) सकाळी साडेअकराच्या सुमारास दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादामुळे एका अल्पवयीन विद्यार्थ्याने चार
देवगाव रंगारी येथील एका शाळेत गुरुवारी (दि. ६) सकाळी साडेअकराच्या सुमारास दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादामुळे एका अल्पवयीन विद्यार्थ्याने चार सहाध्यायांवर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात चार विद्यार्थी जखमी झाले असून, त्यातील एकाची स्थिती गंभीर आहे. त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये दोघांच्या उजव्या दंडावर गंभीर दुखापत झाली आहे, तर एका विद्यार्थ्याच्या पायावर आणि दुसऱ्याच्या पाठीवर चाकूने वार करण्यात आले. शाळेच्या परिसरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विद्यार्थ्यांना पाहून एकच धावपळ उडाली. शाळा प्रशासनाने तातडीने जखमी विद्यार्थ्यांना गावातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, जिथे प्राथमिक उपचार करण्यात आले. गंभीर जखमी विद्यार्थ्याला पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच देवगाव रंगारी पोलिसांनी तातडीने शाळेत धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे व त्यांच्या पथकाने पुढील कारवाई सुरू केली आहे. या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, शिक्षण संस्थेत अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळा प्रशासनाने या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.



















