Nashik TCS Conversion Case: MIM Corporator Arrested for Sheltering Nida Khan

नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (tcs) च्या बीपीओ केंद्रात घडलेल्या लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर घडवून आणण्याच्या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई
नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या बीपीओ केंद्रात घडलेल्या लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर घडवून आणण्याच्या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय देणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवक मतीन पटेल याला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. मतीन पटेल याला छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली, ज्यामुळे या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट समोर आला आहे. न्यायालयाच्या समन्सवर हजर न राहिल्यामुळे मतीन पटेल यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. यापूर्वी प्रशासनाने मतीन पटेल यांचे बेकायदेशीर बांधकाम पाडले होते, ज्यामुळे या प्रकरणात त्यांची भूमिका आणखी गंभीर बनली आहे.
निदा खान हिला जुलै महिन्यात सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता, कारण ती गरोदर आहे. ६ जुलै रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने तिच्या गर्भातील बाळाच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेतला. न्यायमूर्तींनी म्हटले की, “जन्माला येणाऱ्या निष्पाप बालकाला तुरुंगातील कैद किंवा सामाजिक कलंक सहन करावा लागू नये.” मार्च २०२६ मध्ये नाशिक येथील TCS कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, अश्लील शेरेबाजी आणि धर्मपरिवर्तनासाठी दबाव आणण्याचे प्रकार समोर आले होते. मुख्य आरोपी रझा रफिक मेमन याने तक्रारदार महिलेला मानसिक त्रास दिला, तर निदा खानसह इतर सहकाऱ्यांनी त्याला मदत केली, असे तपासात स्पष्ट झाले आहे.



















