Fake IAS Officer Exposed: बनावट IAS अधिकाऱ्याचा पर्दाफाश; ‘भारत सरकार’च्या पाटीसह ‘टेस्ला’ कार जप्त

बिहारमध्ये एका भामट्याने स्वतःला ias अधिकारी म्हणून भासवून अनेकांना फसवले. त्याने थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचा गुप्तहेर असल्याचा दावा केला आण
बिहारमध्ये एका भामट्याने स्वतःला IAS अधिकारी म्हणून भासवून अनेकांना फसवले. त्याने थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचा गुप्तहेर असल्याचा दावा केला आणि ‘भारत सरकार’च्या पाटीसह आलिशान ‘टेस्ला’ कारमध्ये फिरला. खगरिया पोलिसांनी यावर कारवाई करत मनीष गुप्ता नावाच्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंत दुर्मिळ मानली जाणारी ‘टेस्ला’ कार, बनावट ओळखपत्रे, ३१ लीटर परदेशी दारू आणि हरणाची शिंगे यांचा समावेश आहे. गोगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमालपूर येथील गुप्ताच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. चौकशीदरम्यान, आरोपीने पोलिसांना केंद्रीय दक्षता आयोगाचे (CVC) आणि IAS अधिकाऱ्याचे ओळखपत्र दाखवून त्यांना गंडवण्याचा प्रयत्न केला. त्याने अजित डोभाल यांच्या सूचनेनुसार गुप्त मोहिमेवर काम करत असल्याचा दावा केला, परंतु पोलिसांनी या ओळखपत्रांची तपासणी केली असता, हे सर्व दावे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. खगरियाचे पोलीस अधीक्षक भानू प्रताप सिंह यांनी सांगितले की, मनीष गुप्ता याने IAS अधिकारी असल्याचा भास करून बिहारच्या विविध भागांत लोकांची फसवणूक केली आहे. त्याचे सर्व दावे आणि ओळखपत्रे बोगस असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून आलिशान ‘टेस्ला’ कार जप्त केली आहे, जी भारतात दुर्मिळ मानली जाते. याशिवाय, त्याच्याकडे असलेली एक टाटा सफारी कारही जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या मते, आरोपीने या आलिशान गाड्यांचा वापर लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी केला असावा. मनीष गुप्ता याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांना मोठा घबाड लागला आहे. तपासात हरणाची शिंगे बाळगणे हा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गंभीर गुन्हा असल्याने याप्रकरणी वेगळा गुन्हा दाखल केला जात आहे. आरोपीने IAS अधिकारी बनून किती लोकांना फसवले आणि एवढी संपत्ती कशी गोळा केली, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या प्रकरणाची पाळेमुळे खोलवर पसरलेली असण्याची शक्यता असल्याने बिहार पोलिसांचे आर्थिक गुन्हे युनिट या प्रकरणाचा पुढील तपास करणार आहे. गुप्ताने ही आलिशान वाहने आणि संपत्ती फसवणुकीच्या पैशांतून उभी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिस सध्या त्याच्या सर्व बँक खात्यांची आणि मालमत्तेची झाडाझडती घेत आहेत.





















