Arrest of Notorious Criminal: विरारमधून सराईत गुंडाची अटक

कणकवली तालुक्यातील ओटव येथील घरफोडी प्रकरणातील आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) धडक कारवाई करून विरार येथून अटक केली आहे. या कारवाईत
कणकवली तालुक्यातील ओटव येथील घरफोडी प्रकरणातील आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) धडक कारवाई करून विरार येथून अटक केली आहे. या कारवाईत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. बुधवारी (दि. ५) करण्यात आलेल्या या कारवाईत चोरीस गेलेले दोन्ही मोबाईल आणि स्मार्ट वॉच हस्तगत करण्यात आले आहेत. कणकवली पोलिस ठाण्यात या घरफोडीचा गुन्हा दाखल असून, १७ जुलै २०२६ रोजी ओटव येथे दिनेश शशिकांत कोरगावकर आणि नितेश रमेश देवळे यांच्या घरांचे दरवाजे तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला होता. या घरफोडीत सुमारे ५३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता, ज्यामध्ये मोबाईल, एटीएम कार्ड, रोख रक्कम, स्मार्ट वॉच आणि महत्त्वाची कागदपत्रे समाविष्ट होती. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सुरू केला होता.
तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीची ओळख पटली. त्यानंतर, विरार (पूर्व), जिल्हा पालघर येथील श्रमनिवास सोसायटी परिसरात सापळा रचून राजू तुकाराम सुतार (वय ३५, मूळ रा. नाधवडे, ता. वैभववाडी) याला ५ ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने संबंधित घरफोडीची कबुली दिली. आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पुढील तपासासाठी त्याला कणकवली पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. त्याच्याकडून चोरीतील दोन्ही मोबाईल आणि स्मार्ट वॉच जप्त करण्यात आले आहेत, तर उर्वरित मुद्देमालाचा शोध सुरू आहे.



















