Industrial Corridor Development:दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये साडेआठ हजार एकर भूसंपादन

छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शेंद्रा आणि बिडकीन या दोन औद्योगिक वसाहतींनंतर आता साठेआठ हजार एकर जम
छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शेंद्रा आणि बिडकीन या दोन औद्योगिक वसाहतींनंतर आता साठेआठ हजार एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. पैठण तालुक्यातील पाडळी, निलजगाव आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील घारदोन, घारदोन तांडा, गाडीवाट, खोडेगाव या गावांमध्ये ३,१५७ हेक्टर जमीन औद्योगिक विकासासाठी ताब्यात घेतली जाणार आहे. जायकवाडी प्रकल्पाचे उपजिल्हाधिकारी या भूसंपादन प्रक्रियेचे अधिकारी आहेत. याशिवाय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाच हजार एकर अतिरिक्त भूसंपादन करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यापूर्वी शेंद्रा औद्योगिक वसाहतीसाठी २३ लाख रुपये प्रति एकर दर मिळाला होता, तर बिडकीनमध्ये ५६ लाख रुपयांचा दर होता. त्यामुळे ‘समृद्धी’च्या नव्या वाटा पैठण तालुक्यात अधिक विस्तारणार आहेत. नव्या चार गावांमधील भूसंपादनाची अधिक माहिती नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे.
शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्रामध्ये पहिल्या टप्प्यात सुमारे चार हजार हेक्टर म्हणजेच १० हजार एकर क्षेत्रावर औद्योगिक वसाहत करण्याचा हेतू आहे. ऑरिक सिटीचा विकास स्मार्ट इंडस्ट्रियल सिटीच्या धर्तीवर होत असून, यामध्ये ६० टक्के जमीन औद्योगिक वापरासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. उर्वरित ४० टक्के जमिनीवर वाणिज्य, रहिवासी, शाळा, दवाखाने, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स इत्यादींचा समावेश आहे. ऑरिकमधील शेंद्रा आणि बिडकीन या औद्योगिक क्षेत्रात आजपर्यंत अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये पाणी, विद्युत, सांडपाणी, फायरलाइन, इंटरनेट, गॅसलाइन यांसारख्या सेवा समाविष्ट आहेत. याशिवाय, भूसंपादन होणाऱ्या गावांच्या शेजारी पाच हजार एकर अतिरिक्त औद्योगिक वसाहत उभारण्याची योजना आहे. महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळातील अधिकाऱ्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.





















