Training for 10,000 BEST Drivers: चालक प्रशिक्षित, मात्र बस सुरक्षित कधी?

मुंबईतील बेस्ट प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी २०२५ च्या जानेवारीपासून आतापर्यंत ९,८८५ बसचालकांना विविध प्रशिक्षण कार्यक्रमांतून प्रशिक्षित केले आहे. या
मुंबईतील बेस्ट प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी २०२५ च्या जानेवारीपासून आतापर्यंत ९,८८५ बसचालकांना विविध प्रशिक्षण कार्यक्रमांतून प्रशिक्षित केले आहे. या प्रशिक्षणामध्ये नव्या चालकांचे प्रशिक्षण, अपघात टाळण्याचे प्रशिक्षण, विद्युत बस चालविण्याचे प्रशिक्षण आणि उजळणी प्रशिक्षणाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ६,८२४ चालकांनी उजळणी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. तरीही, अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे या प्रशिक्षणांच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बेस्टने थेट तसेच कंत्राटी पद्धतीने चालकांची सेवा घेतली आहे, ज्यामुळे चालकांना मोठ्या बस, वाढती वाहतूक, अरुंद रस्ते आणि पादचाऱ्यांची गर्दी यांसारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो. यामुळे सुरक्षित वाहनचालक कौशल्य आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. २०२५ च्या जानेवारीपासून १,६६० नव्या चालकांनी २१ ते २८ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
प्रशिक्षणाच्या आकडेवारीत उजळणी प्रशिक्षणाचा वाटा सर्वाधिक आहे. कंत्राटी सेवेतील ३,२१० आणि बेस्टच्या ३,६१४ बसचालकांनी एकदिवसीय प्रशिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे सुरक्षित वाहनचालक नियमांची पुनरावृत्ती करणे, पूर्वीच्या चुका टाळण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि वाहन हाताळणीतील बाबींची आठवण करून देणे. तज्ज्ञांचे मत आहे की, चालक प्रशिक्षणाबरोबरच बसची तांत्रिक स्थिती आणि चालकांच्या कामकाजाची स्थिती देखील महत्त्वाची आहे. ब्रेक, सुकाणू यंत्रणा, टायर यांची नियमित तपासणी आवश्यक आहे. याशिवाय, चालकांना पुरेशी विश्रांती मिळते का आणि सलग किती तास वाहन चालवावे लागते याचाही विचार करावा लागेल.





















