FDA mandates compliance for blood banks: रक्तपेढ्यांना नियमांचे पालन करणे बंधनकारक; ‘एफडीए’चे निर्देश; नियमभंग झाल्यास कठोर कारवाई

मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यातील सर्व रक्तपेढ्या आणि रक्तसाठवणूक केंद्रांना रक्तसुरक्षा आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी कठोर नियमांचे पालन करण
मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यातील सर्व रक्तपेढ्या आणि रक्तसाठवणूक केंद्रांना रक्तसुरक्षा आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी कठोर नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, रक्तसंकलन आणि रक्तघटकांचे वितरण याबाबत स्पष्ट कार्यपद्धती जाहीर करून त्याचे पालन करणे अनिवार्य आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रक्तपेढ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे एफडीएने स्पष्ट केले आहे. मानवी रक्त आणि त्याचे घटक हे औषध म्हणून मान्यताप्राप्त आहेत, त्यामुळे कोणतीही रक्तपेढी वैध परवान्याशिवाय रक्त संकलन, प्रक्रिया, साठवण किंवा वितरण करू शकत नाही. प्रत्येक रक्तपेढीला औषधे व सौंदर्यप्रसाधने नियम १९४५ अंतर्गत आवश्यक अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. एफडीएच्या तपासणीत काही रक्तपेढ्या या नियमांचे पालन करत नसल्याचे आढळले आहे, त्यामुळे या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.
अनुसूची ‘एफ’ भाग १२-बी नुसार, प्रत्येक रक्तपेढीमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, समुपदेशन कक्ष, गुणवत्ता नियंत्रण विभाग आणि रक्तघटक प्रक्रिया सुविधा असणे आवश्यक आहे. याशिवाय, नियमांनुसार पात्र वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक पर्यवेक्षक, रक्तपेढी तंत्रज्ञ, परिचारिका आणि समुपदेशकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. प्रत्येक रक्तपिशवीची एचआयव्ही, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, सिफिलिस आणि हिवताप यांची तपासणी करणे, रक्त व रक्तघटकांची साठवण आणि कोल्ड चेन राखणे, याबाबतही नियम आहेत. याशिवाय, रक्तदान शिबिरांसाठी आवश्यक मनुष्यबळ, उपकरणे, आपत्कालीन सुविधा आणि रक्तवाहतूक याबाबतही स्पष्ट निर्देश दिले गेले आहेत.



















