Doctors' Strike Called Off: डॉक्टरांचा संप मागे; ससूनमधील रुग्णसेवा सुरळीत

पुणे शहरात बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीच्या संदर्भात भारतीय वैद्यकीय संघटना आणि महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटना (मार्ड) यांनी पुकारलेले आंदोलन गुरुवारी (दि. ६) मुंब
पुणे शहरात बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीच्या संदर्भात भारतीय वैद्यकीय संघटना आणि महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटना (मार्ड) यांनी पुकारलेले आंदोलन गुरुवारी (दि. ६) मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर मागे घेतले. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्ड शाखेने याबाबतची माहिती दिली आणि तात्काळ कामावर परतण्याचे आवाहन केले. या निर्णयामुळे ससून रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टर नियमित कामकाजावर परतणार असून, त्यानुसार सर्व वैद्यकीय सेवा सुरळीतपणे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मार्डचे अध्यक्ष डॉ. धीरज धोते, सरचिटणीस डॉ. अनुमेहा पराशर, उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश मंत्री आणि अतिरिक्त सरचिटणीस डॉ. अपूर्व अमोल यांनी या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या पत्राची सादरीकरण प्रक्रिया गुरुवारी सायंकाळी अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांच्या कार्यालयात पार पडली.
ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव यांनी सांगितले की, दुपारपर्यंत बहुतेक निवासी डॉक्टर कामावर परतले. त्यामुळे रुग्णालयातील उपचार, शस्त्रक्रिया, प्रसूती आणि आपत्कालीन सेवांवर कोणताही परिणाम झाला नाही. रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले की, आंदोलनाला पाठिंबा देत असतानाही रुग्णांच्या उपचारात कोणताही अडथळा येऊ दिला नाही. याशिवाय, भारतीय वैद्यकीय संघटनेनेही न्यायालयाच्या निर्देशानुसार आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने ३ ऑगस्ट २०२६ च्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.



















