Teacher Recruitment:राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती; पसंतीक्रम देण्यास ११ ऑगस्टपर्यंत मुदत

मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रियेला आता प्रारंभ झाला असून, एकूण ३० हजार २०९ रिक्त पदांसाठी मेगाभरतीची योजना तयार करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य सं
मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रियेला आता प्रारंभ झाला असून, एकूण ३० हजार २०९ रिक्त पदांसाठी मेगाभरतीची योजना तयार करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शाळांमधील शिक्षण सेवक व शिक्षक पदांच्या भरतीसाठी पवित्र पोर्टलचा वापर करण्यात येत आहे. शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्ता यावर विशेष लक्ष दिले जाईल. पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदांच्या १३ हजार ३५१, महानगरपालिकांच्या १ हजार ९५४, नगरपालिका/परिषदांच्या २८०, खासगी शैक्षणिक संस्थांच्या १२ हजार १४८, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळांमधील २ हजार ४२१ आणि शासकीय विद्यानिकेतन मधील ५६ अशा एकूण ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये १९,८८१ पदे मुलाखतीशिवाय तर १०,३२८ पदे मुलाखतीसह भरावयाची आहेत.
या भरती प्रक्रियेत विविध शालेय स्तरांवर पदांची संख्या देखील स्पष्ट करण्यात आली आहे. पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी १४ हजार ३२०, सहावी ते आठवीच्या वर्गासाठी १०,०१२, नववी व दहावीच्या वर्गासाठी ५ हजार ५१३ आणि ११ वी व १२ वीच्या वर्गासाठी ३६४ पदे उपलब्ध आहेत. शिक्षण आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले की, रिक्तपदांच्या ८० टक्के पदे भरली जातील, त्यामुळे एकूण २४ हजार पदांसाठी ही भरती प्रक्रिया होईल. तथापि, शासकीय प्रसिद्धीपत्रकानुसार ही भरती प्रक्रिया ३० हजार पदांसाठी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे, त्यामुळे किती पदे खरे तर भरली जातील याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.



















