Teacher Recruitment Begins:राज्यात ३२ हजार शिक्षक पदांसाठी उमेदवारांची चुरस

मुंबई : राज्यातील विविध जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, आदिवासी विकास विभाग, शासकीय शाळा आणि खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये एकूण ३० हजार २०९ शिक्षक व शिक्षणसेव
मुंबई : राज्यातील विविध जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, आदिवासी विकास विभाग, शासकीय शाळा आणि खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये एकूण ३० हजार २०९ शिक्षक व शिक्षणसेवक पदांसाठी पवित्र पोर्टलवरून भरती प्रक्रियेला गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. या भरतीसाठी १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, त्यामुळे या प्रक्रियेत चुरस निर्माण होणार आहे. पात्र उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार क्रमवारी भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 'शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५' मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे या भरतीसाठी निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. शासनाच्या धोरणानुसार संबंधित संस्थांमधील रिक्त पदे आणि आरक्षणाचा विचार करून ८० टक्के पदांवर नियुक्ती प्रक्रिया केली जाणार आहे. यापूर्वी, २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. उमेदवारांना ६ ते ११ ऑगस्ट या कालावधीत पसंतीक्रम भरणे अनिवार्य आहे.
पसंतीक्रम भरण्यासाठी उमेदवारांनी https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर लॉगिन करणे आवश्यक आहे. उमेदवारांना प्रथम प्राधान्यक्रम नोंदवून तो ११ ऑगस्टपूर्वी निश्चित करणे आवश्यक आहे. जर उमेदवारांनी पसंतीक्रम निश्चित केला नाही, तर पुढील निवड प्रक्रियेत त्यांना सहभागी होता येणार नाही. याबाबत उमेदवारांना एसएमएसद्वारे सूचना पाठविण्यात येत आहेत. पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीशिवाय भरलेल्या पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. भरती प्रक्रियेबाबत कोणतीही अडचण असल्यास उमेदवारांनी edupavitra25@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



















