MBBS Admission 2026: एमबीबीएस-बीडीएस प्रवेश प्रक्रिया सुरू; १२ ऑगस्टपर्यंत अर्ज करावे लागणार

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या केंद्रित प्रवेश प्रक्रियेला (कॅप फेरी) ६
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या केंद्रित प्रवेश प्रक्रियेला (कॅप फेरी) ६ ऑगस्टपासून प्रारंभ केला आहे. नीट-यूजी परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. अर्ज नोंदणीची अंतिम तारीख १२ ऑगस्ट निश्चित करण्यात आलेली आहे, तर पहिली गुणवत्ता यादी २३ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे. यंदाच्या वर्षी प्रवेश प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक पद्धतीने प्रवेश मिळवता येईल.
या वर्षी, संस्थास्तरावर भरल्या जाणाऱ्या जागा आता सीईटी कक्षाच्या माध्यमातून पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यामुळे प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याशिवाय, अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांनी त्यांच्या पात्रतेची पडताळणी करण्यासाठी ११ ऑगस्टच्या आत विदेशी उमेदवार नोंदणी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार केवळ १५ टक्के संस्थात्मक कोट्यातील जागांसाठी प्रवेश मिळवता येईल.
ओबीसी व एसईबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत केंद्रित प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी झाल्यापासून सहा महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेत कागदपत्रांच्या बाबतीत विशेष खबरदारी घेतली जात आहे. आवश्यक कागदपत्रे अपलोड न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी विचार केला जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नोंदणीपूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ठेवावी, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे. आवश्यक कागदपत्रांच्या रंगीत स्कॅन प्रती अपलोड करणे बंधनकारक केले आहे.



















