Violent Attack in Ahilyanagar: महावितरण कर्मचाऱ्याची जमावाच्या हल्ल्यात हत्या

अहिल्यानगर शहराच्या मुकुंदनगर भागात महावितरणच्या कर्मचाऱ्यावर झालेल्या अमानवी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धीरज कचरूसिंग परदेशी (२२) याचा उपचारादरम्यान दुर्दैवी
अहिल्यानगर शहराच्या मुकुंदनगर भागात महावितरणच्या कर्मचाऱ्यावर झालेल्या अमानवी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धीरज कचरूसिंग परदेशी (२२) याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून, विविध संघटनांनी शहर बंदची हाक दिली आहे. हल्ल्यानंतर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, तरीही परिस्थिती तणावपूर्ण आहे. धीरज परदेशी हा महापालिकेच्या ठेकेदार संस्थेत मदतनीस म्हणून कार्यरत होता. शुक्रवारी रस्त्यावर दिव्यांची दुरुस्ती करताना १० ते १५ जणांच्या जमावाने त्याच्यावर हल्ला चढवला. हल्ल्यात धीरजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रविवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु भिंगार कॅम्प पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी हल्ल्याच्या गंभीरतेची जाणीव ठेवून तातडीने तपास सुरू केला. युनूस खानसाहेब शेख याला शनिवारी अटक करण्यात आली, तर मेहराज इब्राहिम सय्यद (२०), मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद (२२) आणि सिराज इब्राहिम सय्यद (२१) यांना तेलंगणातून ताब्यात घेण्यात आले. याशिवाय, आरोपींना पळून जाण्यात मदत करणारे ख्वाजामिया उर्फ अकरम याकूब सय्यद (५२) आणि वसिम रहीम सय्यद (४७) यांनाही अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण सहा आरोपींना भिंगार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. धीरजच्या मृत्यूची बातमी समजताच रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. विविध संघटनांचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन करत आरोपींना कठोर शिक्षेची मागणी करत आहेत.





















