Theft of New ST Bus: जामनेर आगाराची नवीन बस चोरट्याने पळवली

जळगाव जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या जामनेर आगाराची नवी बस अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ही बस 'जिजाऊ' नावाची असून, तिचा क्रमा
जळगाव जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या जामनेर आगाराची नवी बस अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ही बस 'जिजाऊ' नावाची असून, तिचा क्रमांक एमएच १९, एनई ४२१४ आहे. रविवारी रात्री सुमारे अडीच वाजता आगारातून गायब झाल्यानंतर ती जामनेर तालुक्यातील शहापूर गावाजवळील खडकी नदीच्या फरशी पुलावर बंद अवस्थेत आढळून आली. बसचे पुढील चाक पंक्चर झाल्यामुळे चोरट्याने ती तिथेच सोडून पलायन केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी सकाळी शहापूर गावातील लोकांना खडकी नदीवरील पुलावर बस उभी असल्याचे दिसले, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये कुतूहल निर्माण झाले. जळगाव-नेरी-जामनेर या मार्गावर धावणारी ही बस जामनेर आगाराची असल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. शहापूर गावात जामनेर आगारातील काही चालक व वाहक वास्तव्यास आहेत. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बसची पाहणी केली आणि ती जामनेर आगारातून गायब झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी आगार व्यवस्थापक दिनेश नाईक यांना घटनेची माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने बस आगारातून बाहेर काढली. नंतर, संशयिताने बस घेऊन जामनेर शहरातून शहापूरच्या दिशेने प्रवास केला. मात्र, खडकी नदीवरील फरशी पुलाजवळ बसचे पुढील चाक पंक्चर झाल्याने बस पुढे नेता न आल्याने चोरट्याने बस तिथेच सोडून दिली आणि घटनास्थळावरून पलायन केले. पळवून नेलेली 'जिजाऊ' बस जामनेर आगारातून जळगाव-नेरी-जळगाव या मार्गावर नियमित धावते. प्रवाशांच्या सेवेसाठी वापरली जाणारी बस अशा प्रकारे पळवून नेण्यात आल्याने एसटी प्रशासनात खळबळ उडाली आहे. आगार व्यवस्थापक दिनेश नाईक यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. आगार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये संशयित व्यक्ती कैद झाल्याची माहिती मिळाली आहे, त्यामुळे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयिताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. संशयिताने बस नेमकी कोणत्या मार्गाने शहापूरपर्यंत नेली, या मार्गावरील अन्य ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये त्याची हालचाल कैद झाली आहे का, याचाही तपास केला जाण्याची शक्यता आहे. जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस अज्ञात व्यक्तीने पळवून नेली आणि ती काही किलोमीटर अंतरावर जाऊन सोडून दिली, या घटनेने आगाराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बस आगारातून बाहेर जात असताना संबंधित व्यक्तीची कुणालाही चाहूल कशी लागली नाही, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. बस आगारातून बाहेर काढताना सुरक्षा यंत्रणेला याची माहिती कशी मिळाली नाही, तसेच बसच्या चाव्या संशयिताच्या हाती कशा लागल्या, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. पोलीस तपासातून बस पळविण्यामागील नेमका उद्देश, संशयिताची ओळख आणि त्याने बस शहापूरपर्यंत का नेली, याचा उलगडा होण्याची अपेक्षा आहे.





















