Retirement Planning: निवृत्तीनंतर ₹५०,००० मासिक उत्पन्नासाठी गुंतवणूक कशी करावी?

नोकरी करणाऱ्यांसाठी पगार मिळवणे एक आनंददायी अनुभव असतो, परंतु निवृत्तीनंतर परिस्थिती बदलते. निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न थांबते, परंतु घरखर्च, औषधोपचार, वीज बिल
नोकरी करणाऱ्यांसाठी पगार मिळवणे एक आनंददायी अनुभव असतो, परंतु निवृत्तीनंतर परिस्थिती बदलते. निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न थांबते, परंतु घरखर्च, औषधोपचार, वीज बिल यांसारख्या आवश्यक खर्चांची गरज कायम राहते. त्यामुळे, निवृत्तीनंतर दरमहा ₹५०,००० मिळवण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी, वर्षाला सुमारे ₹६ लाखांची आवश्यकता भासते. या गणितात '४ टक्के विथड्रॉअल रूल' वापरण्यात येतो, ज्यामुळे निवृत्ती निधीतून दरवर्षी ४ टक्के रक्कम काढल्यास ती वार्षिक गरज भागवण्यासाठी पुरेशी ठरते. यानुसार, ₹६ लाख मिळवण्यासाठी ₹१.५ कोटींचा निवृत्ती निधी आवश्यक आहे. उदाहरणार्थ, या निधीतून पहिल्या वर्षी ₹६ लाख काढल्यानंतर उर्वरित रकमेवर मिळणारा परतावा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करतो. योग्य नियोजनामुळे हा निधी २५ ते ३० वर्षे पुरू शकतो. ₹१.५ कोटींचा आकडा मोठा वाटत असला तरी, वेळेवर गुंतवणूक सुरू केल्यास हे लक्ष्य गाठणे शक्य आहे. जर तुमचं वय ४० वर्षे असेल आणि तुम्ही ६० व्या वर्षी निवृत्त होणार असाल, तर तुमच्याकडे २० वर्षांचा कालावधी आहे. मात्र, जर तुम्ही ५० व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली, तर तुमच्याकडे फक्त १० वर्षे उरतात, ज्यामुळे दरमहा गुंतवणुकीत मोठा फरक पडतो. २० वर्षे गुंतवणूक केल्यास, सरासरी १२ टक्के वार्षिक परतावा मिळाल्यास, ₹१५,०००च्या एसआयपीद्वारे ₹१.५ कोटींचा निधी तयार होऊ शकतो. पण, १० वर्षे उशीर झाल्यास, दरमहा ₹६६,०००ची एसआयपी करावी लागेल.
निवृत्तीच्या नियोजनात अनेकजण सध्याच्या खर्चाला भविष्यकाळातही तितकंच महत्त्व देतात, पण महागाईमुळे वस्तू आणि सेवांच्या किंमती सतत वाढत असतात. उदाहरणार्थ, आजच्या दरम्यान ₹५०,०००मध्ये घरखर्च भागत असेल, तर ६ टक्के वार्षिक महागाई गृहित धरल्यास, २० वर्षांनंतर त्याच जीवनशैलीसाठी ₹१.६० लाख प्रति महिना लागतील. २५ वर्षांनंतर हा खर्च ₹२.१५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे निवृत्तीचे नियोजन करताना भविष्यातील महागाईचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. एफडी सुरक्षित असली तरी, तिचा परतावा दीर्घकालीन महागाईवर मात करण्यासाठी अपुरा ठरतो. त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये इक्विटी किंवा म्युच्युअल फंडांचा समावेश करणे आवश्यक आहे. तसेच, वाढत्या वयात वैद्यकीय खर्च मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, त्यामुळे चांगला हेल्थ इन्शुरन्स असणे महत्त्वाचे आहे. निवृत्ती निधीतून अनियंत्रित खर्चामुळे निधी लवकर संपुष्टात येऊ शकतो, त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीनेच पैसे काढणे आवश्यक आहे. बाजारातील बदल, वय आणि आर्थिक गरजा लक्षात घेऊन प्रत्येक दोन ते तीन वर्षांनी गुंतवणुकीची रणनीती तपासून आवश्यक बदल करणे आवश्यक आहे.



















