Favorite Actress Question: तुकाराम मुंढे हसले आणि म्हणाले; 'मी..'

महाराष्ट्रातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे नाव सध्या चर्चेत आहे. त्यांच्या कार्यपद्धती, निर्णय आणि धाडस याबद्दल अनेक चर्चा होत आहेत
महाराष्ट्रातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे नाव सध्या चर्चेत आहे. त्यांच्या कार्यपद्धती, निर्णय आणि धाडस याबद्दल अनेक चर्चा होत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक बदल्याही घेतल्या आहेत. FDA आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यभरात छापेमारी सुरू केली. सुरुवातीला हॉटेल्समधील अस्वच्छता, नंतर भेसळयुक्त पनीर आणि भेसळयुक्त दूध यावर कठोर कारवाया करण्यात आल्या. त्यांच्या या धाडसी कारवायांमुळे तुकाराम मुंढे सर्वसामान्यांच्या चर्चेत आले आहेत. नुकतीच त्यांची एक विशेष मुलाखत प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी घेतली. या मुलाखतीत त्यांनी एक मजेदार किस्सा सांगितला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.
मुंढे यांनी सांगितले की, “माझ्या आठवणीत तो काळ नीट नाही, पण १९९८ किंवा ९९ चा असेल. त्या वेळी मी मेन्सचा अभ्यास करत होतो आणि पॅरासाईटमध्ये राहत होतो. आमच्यात एक सवय होती की, अभ्यासासाठी ठराविक ठिकाणावर बसायचं. माझा एक मित्र होता, ज्याचं नाव सांगितलं तर प्रॉब्लेम होईल, कारण त्याची पत्नी ऐकली तर... तो पंकज आहे, जो आता कस्टममध्ये कमिशनर आहे.” त्याने आपल्या मित्राच्या आठवणींवर प्रकाश टाकला.
पुढे मुंढे म्हणाले, “आम्ही दोघंही उशिरापर्यंत अभ्यास करायचो. तो माझ्यापेक्षा एक-दोन तास उशिरा झोपायचा. मी रात्री दोन-तीन वाजेपर्यंत अभ्यास करायचो, तर तो साधारण तीन-चार वाजता झोपायचा. सकाळी उठल्यावर पुन्हा अभ्यासाला बसायचो. एकदा दहा-साडेदहा वाजता पंकज माझ्या मागे आला, त्याने माझ्या गळ्यात हात घातला आणि रडू लागला. त्याला रडताना पाहून मला धक्का बसला. मी त्याला विचारलं काय झालं, पण तो रडतच होता. मग त्याने मला विचारलं, 'पेपर वाचला का?' मी वाचून पाहिलं, पण त्यात काही विशेष दिसलं नाही. त्याने सांगितलं, 'अरे माधुरीचं लग्न झालं...' हे ऐकून मी म्हणालो, 'मग काय झालं?' त्यावर तो म्हणाला, 'माधुरी दीक्षित...' हा किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
यानंतर, अरविंद जगताप यांनी तुकाराम मुंढे यांना विचारलं, 'तुमची आवडती अभिनेत्री कोण?' यावर मुंढे म्हणाले, “हे सांगायची डेरींग मी सध्या करणार नाही. माझा व्यवस्थित संसार सुरू आहे...” त्यांच्या या उत्तरामुळे उपस्थित सर्वजण खळखळून हसले. तुकाराम मुंढे यांच्या या मजेदार किस्स्यामुळे मुलाखतीत एक वेगळाच रंग चढला.





















